महालाभार्थी वेबपोर्टल – शासनाच्या विविध योजनांच्या लाभांची माहिती आता व्यक्तिअनुरुप स्वरूपात

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आजपर्यंत अनेक लोकउपयुक्त उपक्रम यशस्वीपणे व पारदर्शीपणे राबविले आहेत. त्यांच्या डिजिटल महाराष्ट्र या व्हिजनअंतर्गत, नागरिकांना वैयक्तिकरित्या मदत करणाऱ्या ‘महालाभार्थी’ या एका पथदर्शी उपक्रमाचे मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने आज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकी नागरिक कोणत्या योजनांना पात्र होऊ शकतात याची माहिती नागरिकांना व्यक्तिअनुरुप स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एमकेसीएल’ च्या मदतीने ‘महालाभार्थी’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञानातील असा हा नवोन्मेष करणारे, ‘महाराष्ट्र’ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.

गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रामध्ये विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. परंतु या संदर्भात आर्त इच्छेने  काम करण्याऱ्या सर्वांच्या मनात कायम एक अपेक्षा असायची की, ज्या नागरिकांसाठी या योजना बनविलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजनांची माहिती नीट पोहोचावयास हवी. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पनेचा विचार केला गेला आणि एमकेसीएलच्या सहकार्यातून ‘महालाभार्थी’ ही सुविधा प्रत्यक्षात आली. या सुविधेचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये नागरिकांना शासकीय योजनांमध्ये मिळणाऱ्या लाभांची माहिती व्यक्तिअनुरुप स्वरुपात मिळणार आहे. ही सुविधा पूर्णत: मोफत असणार आहे. सध्या यामध्ये २२९ हून अधिक योजनांचा समावेश केला गेला आहे. योजनांच्या माहितीमध्ये वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेता ते बदल पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम cmo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील ‘महालाभार्थी’ लोगोवर क्लिक करून ‘महालाभार्थी’ या पोर्टलवर जावे. तेथे आवश्यक ती माहिती भरून प्रथम नोंदणी करून  लॉगीन करावे. आपली थोडक्यात माहिती भरावी. त्या माहितीच्या आधारे ज्याला नागरिक पात्र होऊ शकतात केवळ अशाच निवडक योजनांची माहिती हे पोर्टल देणार आहे. त्या योजनांमध्ये आपल्याला मिळणारा नेमका लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, योजनांसाठी कुठे संपर्क करायचा ही संक्षिप्त स्वरुपातील माहिती तसेच बहुतांश योजनांचे अर्ज आणि संबंधित शासकीय निर्णय नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. ‘महालाभार्थी’ च्या निमित्ताने नागरिकांना ते संभाव्य पात्र ठरू शकणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभांची महिती एका क्लिक वर मिळून देण्याचे क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेले आहे. येत्या काळात ‘डिजिटल महाराष्ट्र’ या महात्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत योजनांविषयक अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शी सेवा लोकांना देण्याकरीता महाराष्ट्र शासन हे प्रयत्नशील आहे. ‘महालाभार्थी’ उपक्रमासाठी महाराष्ट्रातील संगणक साक्षर युवा वर्गाने, संगणक साक्षर नसलेल्या राज्यातील नागरिकांची मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन माननीय मुख्यमंत्री यांनी या निमित्ताने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *